बालनाट्यातील ‘मधुरमंजिरी’ सुधा करमरकर 

बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या आणि खऱ्या अर्थाने बालनाट्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सुधाताई करमरकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना टीम रिव्हॉल्व्हरची भावपूर्ण श्रद्धांजली!

सुधा करमरकर यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने १९५९ मध्ये ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली होती. मुंबईत १९५९ साली सुधा करमरकर यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने रत्नाकर मतकरी लिखित ‘मधुमंजिरी’या बालनाट्याची निर्मिती करून बालरंगभूमीची मुंबईत मुहूर्तमेढ रोवली. चेटकिणीची अप्रतिम भूमिका त्या करीत असत. पुढे लिटील थिएटर या स्वतःच्या संस्थेची स्थापनाकरून ‘स्नोव्हाइट आणि सातबुटके’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘जादूचा वेल’, ‘अबब! विठू बोलू लागला’, ‘दयावर्दी झुंजार आणि काळा पहाड’, ‘चिनी बदाम’, ‘ह ह ह आणि हं हं हं’, ‘आगपेटीतला राक्षस’, ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’, ‘पोर झिपरी शाळा बीन छपरी’ अशा एकापेक्षा एक बालनाट्यांची निर्मिती करून जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त प्रयोग केले. त्यांच्या नाटकात देखणेनेपथ्य, सुमधुर गाणी, वेशभूषा, संगीत, नृत्य यांचा थाटमाट असायचा. लेखक विनोद हडप व अभिनेत्री लीला हडप या दाम्पत्याने शेवटपर्यंत या बालनाट्य चळवळीत मोलाची साथ दिली होती. एकीकडे सुधा करमरकर मुंबईत हे प्रयोग करत असताना दुसरीकडे पुण्यात सई परांजपे यांनी बालरंगभूमी, पुणे या संस्थेची स्थापना करून ‘पत्ते नगरीत’ हे नाटुकले केले. त्यानंतर ‘शेपटीचा शाप’, ‘जादूचा शंख’, ‘भटक्याचे भविष्य’, ‘सळो की पळो’, ‘झाली काय गंमत’, अशा बालनाटिका करून बालरंगभूमीची चळवळ सुरू केली होती. नंतर जयंत तारे, श्रीधर राजगुरू, मुकुंद तेलीचेरी, प्रकाश पारखीयांनी अनेक बालनाटये सादर करून या चळवळीला हातभार लावला.

सुधाताईंचा जन्म १९३४ साली मुंबईत झाला. वडील तात्या आमोणकर हे साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न असल्यानं त्यांना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळालं होतं. वयाच्या १८व्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या होत्या.

त्यांनी ‘रंभा’ या नाटकात साकारलेली रंभेची भूमिका खूप गाजली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर मुंबईतीलजे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला होता. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेतील ‘उद्याचा संसार’ या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधाताईंना मिळालं होतं. सुधाताईंनी बालरंगभूमीसाठी दिलेलं योगदान खूप मोठं होतं. लिटिल थिएटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. त्यांनीच या बालनाट्यांचं दिग्दर्शन केलं होतं. ‘चिनी बदाम’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, अशी अनेक बालनाट्ये त्यांनी सादर केली. व्यावसायिकरंगभूमीवरही त्यांनी काम केलं होतं. ‘विकत घेतला न्याय’, ‘तो राजहंस एक’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘थँक्यू मि. ग्लाड’, ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’, अशा व्यावसायिक नाटकांतूनही त्यांनी काम केलं. त्यांना २०१२ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने ‘नटवर्य प्रभाकर पणशीकररंगभूमी’ जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीचे मोठे नुकसान झाले असून ही हानी भरून काढणे अशक्य आहे. बालरंगभूमीच्या या देवतेला मानाचा मुजरा !

Aditya


Aditya Bivalkar
With three years of experience as a working journalist, Aditya likes to unravel the mysteries of the city. That is when he is not busy helping produce Marathi plays or organising cultural events. You can connect with him on Twitter at @Bivalkaraditya