मी अनुभवलेला महाराष्ट्र बंद

Feature image credit: The Wire/PTI

भीमा कोरेगाव येथे दंगलीनंतर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईमध्येही जाणवला. एरव्ही घड्याळाच्या काट्यावर चालणारी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कधी नव्हे ते थांबली…. अशा दंगलीच्या वेळी रिपोर्टिंग हे खरे आव्हान असते याच रिपोर्टिंगचा अनुभव खास रिपोर्टर्स डायरी डायरीसाठी शेअर केलाय महाराष्ट्र टाइम्सच्या प्रसिद्ध पत्रकार शर्मिला कलगुटकर यांनी

रिपोर्टिंगसाठी आज बाहेर पडले,  तेव्हा ठाण्याहून ट्रेन सुरळीत सुरु होत्या,  पण भांडुपला जाऊन त्या अडकल्या. अर्धा तास वाट पाहिली,  गाडी हलत नव्हती. पुढे ट्रेन्स रांगेत गपगुमान उभ्या होत्या. ट्रेनमधून उतरले, ट्रॅक वरून चालत पुर्वेला बाहेर पडले, बराच वेळ लिफ्टसाठी हात दाखवला, कुठे जायचंय, कुणी विचारत होतं, घाटकोपर रमाबाई नगर सांगताच छे, नाही जमणार, म्हणत गाड्या पुढे जात होत्या..हा सोळा सतरा वर्षाचा .. “मित्रा!” म्हणून हात दाखवला. तसा थांबला. 

“काय गं,  कुठे जायचंय?”, त्यानेही एकेरीने सुरवात केली. मी म्हटलं रमाबाई नगर.. “मी भांडुप गावात राहतो. तुला कांजूर हायवेपर्यंत सोडेन, पुढे लिफ्ट मिळेल असंही पाहेन, गाडीत पेट्रोल नाहीय, इतकीच मदत करू शकतो, चालेल तर बस..” मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन उडी मारून मागच्या सीटवर बसले, त्याने सुसाट गाडी सोडली. मी म्हटलं,  “अरे हळू, घाटकोपरला जायचंय, वर नाही!!” तसा तो खुलला, गप्पा मारत गेला. त्याला विचारलं,  काय वाटतंय तुला हे सगळं बघून.

“वाईट वाटतं गं..”, तो मोकळेपणाने सांगत होता. त्याची स्वप्नं, या शहराकडून असलेल्या अपेक्षा, ट्रॅफिक, आजचा बंद सगळं काही..तु काय ठरवलंयस? खूप गोष्टी आपल्यापुढे अचानक येतात, त्या आहे तशा स्विकाराव्या लागतात. मी खरं तर बाहेर पडलो ते हे सगळं समजून घ्यायला,  पाहायला. मला आता यावर रिअॅक्ट करायचं नाही आहे पण समजून घ्यायचंय नक्की..मी ऐकत होते, त्याची समज.. त्याने कांजूरला सोडलं, नंबर दिला, पुढची लिफ्ट कुठे मिळेल तेही सांगितलं. नाहीच मिळाली लिफ्ट तर फोन कर, घरी तुला राहता येईल निर्धास्तपणे. टेंशन घेऊ नको.

कांजूरला बरीच तोडफोड सुरु होती, वातावरण टेन्स होतं. पण मला त्याही परिस्थितीत खुदकन हसू आलं, त्याचं ‘टेन्शन घेऊ नकोस’ असं म्हणणं एखाद्या जबाबदार दादाचा सल्ला वाटला.. मी मान हलवली. त्याला नाव विचारलं. तो म्हणाला, “तेच गं, मित्रा…नावही नको, आडनावही नको. तु ताई, मी तुझा मित्र…” मी कडक सॅल्युट ठोकला. त्याला नीट जा म्हणायचं विसरून गेले,  तो जाणारच जणू मला विश्वास होता.. पुढच्या टर्नला आले, अंधेरीकडे जाणारा रस्ता जाम होता. लिफ्टसाठी पुन्हा हात दाखवला, गाड्या थांबत नव्हत्या. रमाबाईमध्ये  वातावरण अस्वस्थ होतं. लोकं रस्त्यावर उतरले होते, शांतता होती अन् ताणही. मला काहीही करून पोहचायचं होतं. लिफ्ट घेत पुढे जाण्याचा हाच मार्ग मला दिसत होता. एक कार थांबली. पंचवीशीचा तरुण. कोटियन. घोडबंदरला त्याची मिटिंग होती ती संपवून तो घरी घाटकोपरला चालला होता. त्याने लिफ्ट दिली. व्हिजिटिंग कार्डसाठी बॅगेत हात घातला तर म्हणाला “रहेने दो, उम्मीद पे दुनिया कायम है..” पुढे एक्सप्रेस वे जाम होता. काही अंतर पुढे आल्यावर चार मुलींनी हात दाखवला. त्या पीएचडी करणाऱ्या मुली होत्या, आज त्यांची तोंडी परीक्षा होती. अडीच ची वेळ होती. त्यांना मांटुग्याला जायचं होतं. ट्रेनशिवाय कुठल्याच प्रवासाची सवय नव्हती. चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. गुगल मॅप सुरु करून त्यातली एक घरी कुणाशी तरी बोलत होती, “किधर जाऊ..कहा रुकू..आज एक्झॅम नही दे पायेंगे.” कोटियनने त्यांना धीर दिला, म्हणाला, “मी यांना घाटकोपरला ड्रॅाप करून तुम्हाला सायन पर्यंत सोडतो, पुढे जाता येणार नाही. माझ्या घरी पेशंट आहे. तिथून तुम्ही लिफ्ट घ्या, चालेल का?”. पोरी होयनाय करत होत्या.

मी दटावलं, “हा भला माणूस राहतो घाटकोपरला अशा परिस्थितीमध्येही सायन पर्यंत येतोय. ट्रेन बंद आहे. कधी सुरु होतील माहित नाही, तुम्ही तिथपर्यंत तर नीट जाल. पुढे काहीना काही मिळेलच..”

जागोजागी रस्त्यावर आंदोलक ठिय्या मांडून बसले होते. त्यात महिला होत्या, छोटी मुलंही होती. हातात झेंडे होते, घोषणाही होत्या..अस्वस्थ शांतता…गाडी अडवली, पुढे जाऊ देत नव्हते. मी म्हटलं, पत्रकार आहे, आज जायलाच हवं! पोलिस कसेबसे तयार झाले, तुमच्या रिस्कवर जा. कोटियनला गाडीची चिंता असेल..तरीही तो म्हणाला, “मॅडम आप उतरो. जो कुछ चाहिये वो रिपोर्ट कर लेना..हम रुकेंगे..” मुलींचं लक्ष घड्याळ्याच्या काट्याकडे होतं. त्यांची घालमेल सुरु होती. कोटियन म्हणाला, “आप यहाँ का काम निपटा लेना आपको अगले स्टॉप तक लेके जाता हू.. तकलीफ नही होगी..” पुढे गाड्या जात नव्हत्या. ज्या गेल्या, त्या मागे वळून येत होत्या. दोन मुलं हातात झेंडा घेऊन बाईकवर आले. वीस-बावीस वर्षांची. काय तुमचं! मी स्पष्टपणे खऱं काय ते सांगितलं..पत्रकार आहे,  मला पुढे जायचंय.. तो म्हणाला, हरकत नाही.. तुम्ही डाव्या बाजूने गाडी घेऊन या.. आम्ही तुमच्या बाजूने बाईकवर येतो. निर्धास्त राहा.. कुणी काही करणार नाही.. कोटियनने गाडी मुख्य चौकात आणली..मी त्याला म्हटलं, “आप यहाँसे निकलो”. मुलींना नंबर दिला, पोहचेपर्यंत अपडेट द्या. कोटियनने पोलिसांनी दाखवलेल्या बोळातून गाडी पुढे नेली.. मी पुन्हा पुन्हा थॅक्यू म्हटलं.. तो हसून म्हणाला, “मॅडम यही वक्त है..एक दुसरे के साथ रहेना का, संभलनेका”. किती खरं सांगत होता तो..

पोलिसांनी सांगितलं होतं मोबाईल आत ठेव. मी माझंच घोडं दामटवलं, फोटो घेत राहिले. त्या मुलांनी पाहिलं. व्हिडिओ काढलास काय माझा? कुणाला द्यायचाय?, पोरं वैतागली. म्हटलं मोबाईल घ्या, जे काही उडवायचं आहे ते उडवून टाका.. तुम्हाला माझ्याकडून कुठलाच त्रास होणार नाही. समोर छोटी मुलंही होती, अस्वस्थ झाले… मनात अनेक विचार आले. वाद घालायचा नाही, आवाज चढवायचा नाही. मी पक्कं ठरवलं होतं.  तो म्हणाला.. हे बघ आम्हीही कुणालाच त्रास देत नाही, फारच राग आला तर टायरमधली हवा काढून टाकतोय.. मी गॅलरीतले निम्म्याहून अधिक फोटो उडवले. तिथे काढलेले तर सगळेच.. मागच्या टप्प्यांमधले काही होते.

मला अजून थोडा वेळ थांबायचं होतं. कॉल घेत होते. काय करायचं..दुपार चढली होती. सणकून पोटात खड्डा पडला होता. घाईत निघाले होते. मोबाईल बॅगेत टाकला, लिस्टिंगची वेळ जवळ येत होती. आता चालत जायचं, डावीकडून पहिला टर्न, पाऊण तास.. पुढे निघाले तर पुन्हा काही बायकांचा घोळका पुढे आला, मोबाईल दे आणि पुढे जा.. हे मला कबुल नव्हतं. शांतपणे उभी होते. मी गर्दीचा ऊसूल तोडला होता. त्यांना खात्री वाटत नव्हती.. याच गर्दीतला कोटियनच्याच वयाचा असलेला एक मुलगा मघापासून माझे हेलपाटे पाहत होता. त्याने पारलेचा बिस्किटचा पुडा आणि पाण्याची बाटली पुढे केली. खाऊन घ्या.. इथून बाहेर पडेपर्यंत दिड दोन तास तर सहज जातील..मी पाणी घेतलं. थँक्स म्हटलं. तसा तो म्हणाला, “कळतंय,  तुम्ही तुमचं काम करताय..पण नियम सगळ्यांना सारखाच नाही का?” मी मान हलवली. पाच वाजले की सुरळीत होणार होतं सगळं. आपलं शहर पूर्वीसारखं..

पुढे जाता येईल का पाहिलं तर पुन्हा तेच. मोबाईल पुराण. थांबून राहिले.. पलीकडच्या गाडीतून एक ओळखीचा चेहरा डोकावला.. सीमा होती. तिच्या काही कामानिमित्त ती मुंबईला गेली होती. तिथेच अडकली होती. ती म्हणाली “ये गं..जाऊ सोबत.”

त्या रेटारेटीत त्या छोट्या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला होता. लक्ककन काही हललं होतं. बातम्या फाईल झाल्या. रेल्वे रुळावर आली. दुकानं उघडली. सुरळीत सुरु झालं सगळं.. सगळा दिवस संगतवार लावून पाहिला.. लक्षात आलं.. आज ओला/ऊबेर बुक करुन मुंबईत वाट्टेल तिथे जाण्याची सोय नव्हती… यापूर्वी अशा अनेक चरचरीत आठवणी मनात ताज्या आहेत. कमला मिल, खेतवाडी, भानू फरसाण मार्टच्या अपघातात गेलेल्यांचे चरे अजूनही पुसट झाले नाहीत. तरीही पूर्णपणे अनोळखी असलेला मित्र, कोटियन, बिस्कीट देणारा तो, आईच्या वयाची असलेली तरी हक्काने सीमा म्हणवून घेणारी सीमा रेडकर. या सगळ्यांनीच आज सांभाळलं. आश्वस्त केलं. त्या चिमुकल्याच्या व्हिडिओने आलेला अस्वस्थपणाचा ताण थोडा कमी झाला. गर्दीला चेहरा नसतो. ती उसळते, हेच ऐकलंय कायम. पण याच गर्दीतल्या माणसांचा एक आश्वासक चेहराही मला दिसला. मित्रा, कोटियन, सीमा, बिस्कीट देणारा तो, झेंडा घेऊन गाडी पुढे काढणारा….कोण होते हे सारे माझे..? हे लिहलं अन् मनात गडद विश्वासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं. आज मला शांत झोप लागणार आहे..!


Sharmila KalgutkarSharmila Kalgutkar
Sharmila Kalgutkar in known for her extensive coverage on health and gender issues. A working journalist with Maharashtra Times, she has won many awards for her reportage. You can connect with her on Twitter at @KsharmilaMT