चित्रपट वाढतायत पण यश?

भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात दादासाहेब फाळके या मराठी माणसाने 3 मे 1913 रोजी ‘राजा हरीश्चंद्र’ या चित्रपटाद्वारे केली. अथक परिश्रम आणि चिकाटीने दादासाहेबांनी ज्या माध्यमावर फक्त पाश्च्यात्य लोकांचं अधिराज्य होतं ते क्षेत्र आत्मसात करुन त्याची ओळख आपल्या भारत देशाला करुन दिली. त्यानंतर कालानुरुप चित्रपट माध्यमात बदल होत गेले. परंतु तरीही विषयाचे नाविन्य जपणं आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती करणं ही मराठी चित्रपटांची वैविध्यपूर्ण बाजू दिसून येते. परंतु एक प्रेक्षक म्हणून आज 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना मराठी चित्रपटांबाबतीतले व्यावसायिक अपयश मात्र डोळ्यांना खुपणारे आहे. एकीकडे चित्रपट वाढत असताना त्याचे व्यावसायिक यश मात्र दिसून येत नाही यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

आज मराठी चित्रपट तंत्रज्ञानाच्या  बाबतीत सकस आणि दर्जेदार झाला आहे. अनेक तरुण आणि अभ्यासू दिग्दर्शक आज वैविध्यपूर्ण विषय मराठी चित्रपटांमध्ये हाताळत आहेत. अनेक जागतिक चित्रपटांमध्ये मराठी चित्रपट स्वतःचा ठसा उमटवत आहेत. तरीही तिकीटबारीवर पैसे कमावण्यात मराठी चित्रपट कमी पडत आहे. 

Zee ने ‘साडे माडे तीन’ या चित्रपटापासून चित्रपट निर्मितीत उतरायचं ठरवलं. मराठी चित्रपटविश्वाला त्यामुळे ऐतिहासीक कलाटणी मिळाली. सद्यस्थितीत मराठीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये Zee चं नाव अग्रक्रमाने येतं. मग तो ‘दुनियादारी’ असो किंवा ‘सैराट’. त्यामुळे Zee चा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याची एक दोन महिने आधीपासूनच जोरात प्रमोशन सुरु होतं. याचा फायदा त्या चित्रपटांना सुद्धा होतो. परंतु हे चित्र इतर चित्रपटांच्या बाबतीत मात्र दिसत नाही. हिंदीतल्या अनेक प्रथितयश असामींनी उदा.संजय लीला भन्साली, एकता कपूर यांनी अनुक्रमे ‘लाल इश्क’, ‘ता-यांचे बेट’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. परंतु या चित्रपटांना मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाला. काही मोठ्या बॅनरचा अपवाद वगळला तर हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटांचं प्रमोशन तितकंसं होताना दिसत नाही.

एकंदर मराठी चित्रपटांच्या परिस्थितीबाबत बोलताना दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं की, “सैराट चालला हे चांगलंय. पण त्याचबरोबर किती चित्रपट नाही चालले हे कोणीच बघत नाही. ‘याचा विचार केल्यास असे दिसून येते की सैराटने विक्रमी कमाई बाॅक्स ऑफीस वर केली. परंतु त्याच वर्षी ‘सैराट’ सोबत पुढे मागे आलेले ‘पोश्टर गर्ल’, ‘YZ’ यांसारखे चित्रपट चांगले असूनही त्यांना व्यावसायिक यश मिळवता आलं नाही. त्याचबरोबर ‘सैराट’ नंतर त्याच पठडीतले ‘रांजण’ सारखे चित्रपट आले. परंतु असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. किंवा विषयात नाविन्य नसल्याने प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली.”

मराठी सिनेसृष्टीत काहीवेळेस दोन मोठ्या चित्रपटांची सुद्धा टक्कर होते. उदा. ‘मुंबई-पुणे-मुंबई 2’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’. तसेच 2017 साली आलेले ‘जाउंद्या ना बाळासाहेब!’ आणि ‘फॅमिली कट्टा’. असे दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाल्याने चित्रपटाचे व्यावसायिक गणित बिघडले. मराठी सिनेविश्वात चित्रपटाची संख्या वाढली आहे हे चांगलं असलं तरी निर्मात्यांमध्ये संगनमत असेल तर चित्रपट व्यावसायिकरित्या यशस्वी होण्यास मदत होऊ शकते.

चित्रपटाचे निर्माता हा चित्रपटांचा आधारस्तंभ असतो. परंतु जेव्हा दोन मोठे सिनेमे एकमेकांसमोर एकाच तारखेला प्रदर्शित होतात तेव्हा निर्मात्यांमध्ये संगनमत असणं हे चित्रपटासाठी फायदेशीर असतं. यासाठी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ या  हिंदीमधल्या दोन सिनेमांकडे बघता येईल. पॅडमॅन ची प्रदर्शनाची तारीख 26 जानेवारी ही ठरलेली होती. पद्मावत सुद्धा त्याच्या आधी नियोजीत तारखेला प्रदर्शित होणार होता. परंतु देशभरात झालेली हिंसात्मक निदर्शनं आणि सेन्साॅर या कचाट्यात सापडलेला पद्मावत नियोजीत तारखेला प्रदर्शित होऊ शकला नाही त्यामुळे निर्मात्यांनी पद्मावत 26 जानेवारीला प्रदर्शित करायचा ठरवला. आता दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. त्यामुळे व्यावसायिक तोट्याचा संभाव्य धोका ओळखून संजय लीला भन्साली (पद्मावत) आणि अक्षय कुमार (पॅडमॅन) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संगनमताने अक्षय कुमारने पॅडमॅन ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आणि पद्मावत साठी प्रदर्शनाची वाट आणखी सुकर बनवली. तुलनेने मराठी सिनेमात निर्मात्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये याच संगनमताचा अभाव असलेला दिसून येतो. त्यामुळे जेव्हा दोन मोठे मराठी चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा कोणत्या तरी एका चित्रपटाला किंवा दोघांनाही व्यावसायिक अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही आणि निर्मात्याला सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आज हिंदी चित्रपटसृष्टी देशभर फोफावत चालली आहे. ज्या मराठी माणसाने या चित्रपट माध्यमाची ओळख देशाला करुन दिली याच चित्रपटमाध्यमात आज हिंदी सिनेसृष्टी देशात वरचढ ठरली आहे.

त्यामुळे हिंदीशी सुद्धा स्पर्धा ओघाने येते. कारण आज महाराष्ट्रात तिकीट दर जास्त असले तरी मराठी माणूस हिंदी चित्रपट पाहण्याला पहिलं प्राधान्य देतो.

कारण हिंदीतला चकचकीतपणा आणि कलाकारांची लोकप्रियता ही सर्वश्रृत असते. परंतु तुलनेने मराठीत मात्र आज असा एकही कलाकार नाही जो स्वतःच्या नावावर चित्रपट यशस्वी करुन दाखवेल. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टी ही आशयघन असली तरीही ही दुखरी बाजू सर्वांसमोर उघड आहे. अंकुश चौधरीच्या ‘देवा’ या चित्रपटाला सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ मुळे चित्रपटगृह फारच कमी मिळाले. यावेळी राजकीय नेत्यांनी पुढे येऊन आंदोलन करुन ‘देवा’ला चित्रपटगृह मिळवून दिले. परंतु याबाबतीत मात्र कलाकारांची उदासीनता पहायला मिळते.

एकदा शूटींग संपलं की आपलं काम झालं या भावनेने बहुतेक मराठी कलाकार काम करत असतात. अशावेळी स्वतः कलाकारांनी पुढे येऊन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला पाहीजे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचला तरच मराठी चित्रपटाच्या कक्षा विस्तारतील आणि प्रेक्षकांमध्ये मराठी चित्रपटांबाबत विश्वासार्ह्यता जपली जाईल.

‘अद्भुत’ या यू-ट्यूब चॅनलवर एका कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी वक्तव्य केलं की, “मराठी सिनेमा कोणत्या ठिकाणी कसा चालतो आहे हे पहाणं सुद्धा आवश्यक आहे. पुण्यात कोणता सिनेमा चालतोय,सांगलीत कोणता चालतोय याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे.” या वक्तव्याप्रमाणे निर्मात्यांनी ठराविक भागातल्या प्रेक्षकांचा विचार करुन सिनेमाचं योग्य प्रकारे वितरण करणं हे व्यावसायिकदृष्ट्या तितकंच महत्वाचं आहे. आज मुंबईमध्ये ‘भारतमाता’ सारख्या चित्रपटगृहात फक्त मराठी चित्रपटांचे शो दाखवण्यात येतात.परंतु तरीही वर्षभर हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट सोडल्यास तिकीटबारीवर शुकशुकाट असतो. मोबाईलमुळे सर्व काही ऑनलाईन पहायची सोय आपल्याला मिळालीय. त्यामुळे ‘चित्रपट नेटवर कधी येतोय? तसेच टी.व्ही.वर कधी आहे?’ अशी मानसिकता प्रेक्षकांची आहे.त्यामुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये खेचले जातील हे उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेऊन प्रामाणिकपणे उत्तम मनोरंजनात्मक  चित्रपट बनवण्याकडे दिग्दर्शक, निर्मात्यांचा कल असला पाहीजे.पूर्वी दादा कोंडके यांच्या चित्रपटांना खूप मोठी रांग असायची असं सांगण्यात येते. तसेच अलीकडे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘दुनियादारी’, ‘सैराट’, ‘फास्टर फेणे’ यांसारख्या चित्रपटांबाबतीत ही परिस्थिती दिसून आली. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले पाहीजे. मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी समृद्ध असा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी माणूस हा चोखंदळ रसिक प्रेक्षक मानण्यात येतो. त्यामुळेच बदलणाया पिढीचा, बदलणाया

संस्कृतीचा एकूणच अंदाज घेऊन त्याचा अंश चित्रपटांत आणणं हे दिग्दर्शकांसाठी एक मोठं आव्हान आहे. कारण प्रेक्षकांची अभिरुची बदलत चाललीय. त्यामुळे त्यांची आवड जपून मनोरंजन देणं आणि मनोरंजन देता देता किंचीत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची जबाबदारी आता चित्रपटकर्त्यांवर आहे. तरच मराठी चित्रपट या युवा वर्गाला भावेल, भिडेल आणि आवडेल. यातूनच चित्रपटांना यश मिळत जाईल.

यामुळे, दादासाहेब फाळकेंचा वसा घेतलेली आजची मराठी सिनेसृष्टी ही भारतात नाही तर जगभरात स्वतःचा ठसा उमटवेल. तसेच मराठी चित्रपट हा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईलच शिवाय तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचेल.


Devendra

देवेंद्र जाधव
पत्रकारिता क्षेत्रात अनुभव मिळविण्याचा देवेंद्रचा प्रयत्न असून मराठी साहित्याचा तो विद्यार्थी आहे. माणसांचं निरीक्षण करून त्यांचा स्वभाव जाणून घेण्याची त्याला आवड आहे. त्याचबरोबर विविध विषयांवर लिहिण्याचा त्याला छंद आहे.

Leave a comment